वॉशिंगटन : अमेरिकेच्या अध्यक्षांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसलाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन गोळीबाराने हादरली. रविवारी एका हल्लेखोराने गोळीबार केला. व्हाईट हाऊसच्या सुरक्षा यंत्रणांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात हल्लेखोर जखमी झाला आणि उपचाराला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असतानाच एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एक व्यक्ती बॅग घेऊन सीक्रेट सर्व्हिस चेकपॉईंटच्या दिशेने गेला. तिथे असलेल्या अधिकार्यांच्या लक्षात येण्यापूर्वीच त्याने बॅगेतून पिस्तुल काढले आणि गोळीबार सुरू केला. तब्बल २५ फेर्या झाडण्यात आल्या.
हल्लेखोर जखमी झाला आणि उपचारापूर्वी मृत्यू
अचानक गोळीबार सुरू झाल्याने व्हाईट हाऊस परिसरात धावपळ सुरू झाली. त्यानंतर जवानांनी हल्लेखोराला रोखण्यासाठी मोहीम सुरू केली. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, व्हाईट हाऊस परिसरात गोळीबार करणार्या हल्लेखोरांवर स्टेट्स सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांकडून प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला. त्यात तो जखमी झाला. रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर २१ वर्षांचा असून, नसीरे बेस्ट असे त्याचे नाव आहे. तो मेरीलँड येथील होता. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात एक नागरिक जखमी झाला आहे. हा व्यक्ती हल्लेखोराच्या गोळीबारात जखमी झाला की, जवानांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात, याबद्दल कळू शकलेले नाही. या गोळीबारात सीक्रेट सर्व्हिस जवानही जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
गोळीबारावेळी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच होते
ज्यावेळी ही गोळीबाराची घटना घडली, तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये होते. गोळीबार सुरू होताच सुरक्षा जवानांनी संपूर्ण परिसर बंद केला आणि प्रत्युत्तरात गोळीबार सुरू केला. त्यामुळे हल्लेखोराला व्हाईट हाऊसच्या इमारतीपर्यंत पोहोचता आले नाही.